राज्यात आणखी एका रुग्णालयात हलगर्जीपणा उघड ;
राज्यात आणखी एका रुग्णालयात हलगर्जीपणा उघड ; "ही" धक्कादायक माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर आता बुलढाण्यातील एका रुग्णालयाचा आणखी हलगर्जीपणा समोर आला आहे.

बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील एका रुग्णालयाने हलगर्जीपणा केला आहे. या रुग्णालयाने चक्क चाळीस हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडवून ठेवला.

मलकापूर शहरातील हकिमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रशासनावर आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाने रुग्णालय तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर मृतदेह नातेवाईंकाच्या ताब्यात दिला.

मलकापूर शहरातील हकिमी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

मरण पावलेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडकून ठेवला. मलकापूर शहरातील घटनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ,  मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (68) ह्या घरात पाय घसरून पडल्याने त्यांचा डावा हात आणि पाय फ्रॅक्चर होऊन जखमी झाल्या. त्यांना मलकापूर येथील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ ५ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलं. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ७ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी 4 वाजता त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. विनवणी करूनही मृतदेह ताब्यात देत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक यांनी सदर घटनेची माहिती शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांना फोन वरून दिली . शहरातील उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेत मृतदेह अडकवून ठेवण्याचा जाब विचारत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं काय?

हॉस्पिटल प्रशासनाने या आरोपांचं खंडन केलं आहे. सदर महिलेचे अनेक कागदपत्र जमा करणे बाकी होते. या महिलेचे शासनाकडून मान्यता घेणे बाकी असल्याने कागदी प्रक्रिया करण्यास वेळ लागल्याने मृतदेह देण्यास विलंब झाल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. मात्र आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपये मागितले नाही. असेही रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अनुप मालपाणी यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group