पुणे : पुण्यातील एका रुममध्ये सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत सात जणांना अटक केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आलीय. आज त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. डॉ. प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी केलाय. याप्रकरणी रोहणी खडसे अॅक्शन मोडमध्ये आल्याच पहायला मिळालं.
काल त्यांनी पोलिसांची भेट घेत प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, याबाबत माहिती घेतली. आता आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे ह्यांनी अंगावर वकिलीचा कोट चढवला. त्या सुनावणीदरम्यान, पुणे न्यायालयात वकिलीचा कोट घालून हजर होत्या.
खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजवल खेवलकरांसह इतर सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. ही कोठडी आज संपल्यानंतर त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्यायालयात रोहिणी खडसे यादेखील दिसल्या. खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलंय. त्या खुद्द एक वकील आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यादेखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून आल्या होत्या.
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सुनावणी आणि घडलेल्या प्रकरणाविषयी प्रश्न केले. परंतु हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे यावर काही बोलू शकत नाही. परंतु योग्यवेळी मी माझी भूमिक मांडेन असं रोहिणी खडसे न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर म्हणाल्या.