भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागरिकांना बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, आणि कोल्हापूरच्या घाट भागात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल. काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
किनाऱ्यावर मान्सूनची सक्रियता तीव्र होत असल्याने, आयएमडीने भरती ओहटीचा इशारा जारी केला आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ११.९२मिमी, पूर्व उपनगरात १५.८४ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्याची ही प्रणाली जसजशी उत्तर पश्चिमेला वळेल तसतसा उत्तरेकडील राज्यांमध्येसुद्धा पाऊस वाढताना दिसेल. ज्यामुळे १६ ते १७ जुलैदरम्यान उत्तरेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये राजस्थानचा पूर्व भाग आणि त्याला लागून असणाऱ्या मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढे हाच पाऊस धीम्या गतीनं पश्चिमेकडे सरकताना दिसेल.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.