राज्यात मराठी-अमराठीचा वाद चांगलाच रंगला आहे. दरम्यान वाशीमध्येही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मराठी-अमराठी वादात मराठी विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्याने व हॉकी स्टिकने मारहाण झाल्याची घटना वाशीत घडली आहे.
महाविद्यालयाच्या गेटवरच विद्यार्थ्याला अडवून त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात सध्या मराठी - अमराठीचा मुद्दा गाजत आहे. मराठी न बोलण्यावरून ठिकठिकाणी वादाचे, हाणामारीचे प्रकार घडत आहेत. त्यातच मराठी - अमराठीच्या वादाचे लोण महाविद्यालयांपर्यंत देखील पसरले आहे. त्यातून एका मराठी विद्यार्थ्याला जबर मारहाण झाली आहे.
वाशीतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला. विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये चॅटिंगदरम्यान मराठी - अमराठीचा वाद उद्भवला होता.
त्यातून सूरज पवार (२०) व फैजान नाईक (२०) यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यातून सोमवारी दुपारी महाविद्यालयाच्या गेटवरच दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये फैजान व त्याच्या तीन साथीदारांनी सूरजला लाथा बुक्यांसह हॉकीने मारहाण केली.
याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.