अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 27 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील निंबी गावात काल 17 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आरोपीच्या निवासस्थान परिसरात पीडित अल्पवयीन मुलाचे नातेवाईक बांधकामाच्या कामानिमित्त गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील होता. थोड्यावेळाने लांब असलेल्या वाडग्यात दोन लहान भावंड खेळायला गेले. येथे वाडग्यात पीडित बालक व त्याचा भाऊ असे दोघेजण खेळणी खेळत होते. आरोपीने पीडित बालकाच्या भावाला पिण्याचे पाणी आणण्यासाठी घरी पाठवले. त्यानंतर यातील पीडित बालक हा एकटा होता, याचीच संधी साधून त्याने त्याच्यावर अनैसर्गिकपणे लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर पीडित मुलाने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लागलीच कुटुंबियांनी उरळ पोलीस स्टेशन गाठलं. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. आरोपीला आज पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.