राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारील मतमोजणी म्हणजे निकाल आहे. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार, २ जानेवारी रोजी राज्यात ठिकठिकाणी मोठ्या घडामोडी घडल्या. अकोला येथे देखील घडामोडींना वेग आला.
अकोला महानगरपालिका येथे सहा झोनमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६३३ जणांपैकी १६४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात एकूण ४६९ उमेदवार कायम राहिले आहेत. विशेष म्हणजे १६४ उमेदवारांमध्ये माजी महापौर, माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर सुमनताई गावंडे, काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, भाजपचे दोन माजी नगरसेवक गोपी ठाकरे व सविता ठाकरे यांच्यासह उद्धवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने आणि शिंदेसेनेच्या शहर प्रमुखासह माजी नगरसेविकेच्या पतीने आणि एआयएमआयएमच्या महिला उमेदवाराने रिंगणातून माघार घेतली आहे.
भाजपचे उपमहापौर राजेंद्र गिरी यांनी गुरुवारीच अर्ज मागे घेतला होता. शुक्रवारी काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीच्या १७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अनेक प्रभागांतील लढर्तीचे स्वरूप बदलले आहे.
काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज रद्द झाला तर, या दृष्टिकोनातून डमी अर्ज भरला होता. शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांच्या अर्धांगिनींनी अर्ज मागे घेतले. वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काहींनी माघार घेतली, तर काहींनी अर्ज कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.