देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा येथे ते सेवा देत होते. जवान शहीद झाल्याने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
अकोला जिल्ह्याचे सुपुत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाने हे भारतीय सेनेतील 12 मराठा लाईट इन्फंट्री तुकडीत कार्यरत होते. दहशतवाद विरोधी (काउंटर इन्सर्जन्सी) कारवाई दरम्यान जम्मू - काश्मीर मधील कुपवाडा सेक्टर येथे कर्तव्यावर असताना ७ जानेवारी रोजी त्यांना वीरमरण आले.
शहीद जवान वैभव लहाने यांच्यावर अकोला जिल्ह्यातील कपिलेश्वर या त्यांच्या मूळगावी सैनिकी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिकांनी मानवंदना दिली. तर पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या 3 फैरी झाडून सलामी देत मानवंदना दिली. यावेळी 'शहीद जवान अमर रहे', 'भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तसेच संपूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या.
देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या अकोला जिल्ह्यातील नायक वैभव लहाने यांच्या वीरमरणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे CHM रामेश्वर पाटील यांच्यासह मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे सैनिक, व वैभव लहाने यांच्या कुटुंबियांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. जवान वैभव लहाने यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.