जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागत नाही तोच एक खळबळजनक बातमी येत आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी टेरिटोरिअल आर्मीच्या दोन जवानांचे अपहरण केले आहे. यामुळे सैन्य दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , दोनपैकी एक जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. जवानांच्या अपहरणानंतर सैन्य दलाने बंदोबस्त वाढविला असून परिसरात शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. अनंतनागच्या जंगल भागात या जवानांची तैनाती करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका करून आलेल्या जवानाकडून माहिती घेतली जात आहे.
अपहरण केलेल्या टीए जवानाचे नाव हिलाल अहमद भट आहे. तो 162 युनिट टीएचा जवान आहे. तो अनंतनाग जिल्ह्यातील मुकदमपोरा नौगाम येथील रहिवासी आहे. तर फयाज अहमद शेख नावाचा दुसरा जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून परतला आहे. पण त्याच्या खांद्याला आणि डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.