पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ रात्रीपासून तुफान गोळीबार सुरू आहे. जम्मू-काशमीरच्या राजौरी, पुंछ आणि जम्मू या जिल्ह्यामध्ये पाकिस्तानकडून सकाळपासून गोळीबार सुरू आहे. या गोळीबारामध्ये एका वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांच्या घरावर पाकिस्तानकडून दारूगोळा फेकण्यात आला. यामध्ये राज कुमार थापा आणि त्यांच्या घरातील दोन स्टाफ गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण राज कुमार थापा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर इतर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'राजौरीहून एक दुःखद बातमी आहे. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक निष्ठावंत अधिकारी गमावला आहे.
राज कुमार थापा यांनी काल उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातील व्यवस्थेचा आढावा घेतला होता आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीतही ते सहभागी झाले होते.
पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमधील कांग्रा-गल्हुट्टा गावातील एका घरावर पाकिस्ताने फेकलेले मोर्टार पडल्याने ५५ वर्षीय रशिदा बेगम यांचा मृत्यू झाला. जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बिडीपूर जट्टा गावातील रहिवासी अशोक कुमार उर्फ शौकी यांचा मृत्यू झाला.
पुंछमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारात ३ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जम्मू शहरातील रेहारी आणि रूपनगरसह निवासी भागात दारूगोळे आणि ड्रोन हल्ल्याने अनेक जण जखमी झालेत.