जगात अशांतता पसरवणाऱ्या पाकिस्तानातच सध्या अशांतता पसरली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या निधनाच्या बातम्या वेगाने पसरत आहे. मात्र पाकिस्तानकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान नेमके कसे आहेत, जिवंत आहेत की नाही? याबाबत आता विविध चर्चांना उधाण येत आहे.
जेलमध्ये बंद असलेल्या इमरान खानबद्दल दीड महिन्यांपासून कोणतीही माहिती दिली जात नाही, कुटुंबीयांनाही त्यांची भेट घडवली जात नाही असा खुलासा कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. याच दरम्यान इमरान खानची मुले कासिम आणि सुलेमान यांनी शंका उपस्थित केली आहे की अधिकारी काहीतरी असे लपवत आहेत जे दुरुस्त करता येणार नाही.
ही भीती तेव्हा निर्माण झाली जेव्हा इमरान खान यांच्या निधनाच्या अफवा सुरु झाल्या. आणि इस्लामाबादमध्ये अचानक कलम 144 लागू केला गेला आहे.
पाकिस्तानात इमरान खानची भेट घेण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरू आहे. इमरान खानच्या बहिणी आणि मुले सातत्याने सरकारकडे त्यांच्या जिवंत असल्याचा पुरावा मागत आहेत. मात्र सरकार याबाबत मौन बाळगून आहे.
इमरान समर्थक आर-पार करण्याच्या स्थितीमध्ये आहेत, यासाठी त्यांच्या बहिणीही तयार आहेत. याठिकाणी आंदोलन सुरु असून इमरान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या समर्थकांनी इमरानची भेट होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही कंबर कसली असून जेलबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक सभा-समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने इस्लामाबाद आणि रावलपिंडीत कलम 144 लागू केले आहे. हा आदेश डेप्युटी कमिशनर डॉ. हसन वकार चीमा यांनी जारी केला असून तो 1 ते 3 डिसेंबर या तीन दिवसांसाठी लागू राहील. आदेशात म्हटले आहे की रावलपिंडी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आहे, म्हणून लोकांच्या सुरक्षेसाठी, शांतता आणि व्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.