पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. अशातच पाकिस्तानमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कराचीपर्यंत या स्फोटामुळे दहशत पसरली आहे.
पाकिस्तानातील लाहोरमध्ये एकामागून एक असे तीन स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी लाहोर एअरपोर्टजवळ हे स्फोट झाले. या स्फोटामुळे बऱ्याच किलोमीटरपर्यंत हादरले बसले. त्यानंतर सायरनचा आवाज आला. स्फोटानंतर सर्व नागरिक इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. आकाशामध्ये धुराचे लोट पसरले होते, अशी माहिती पाकिस्तानी पोलिसांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या मीडियाने हा ड्रोन हल्ला असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.
त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीती आणखी वाढली आहे. हा स्फोट कुणी केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लाहोरच्या गोपाळनगर आणि नसीराबाद परिसरात वाल्टन एअरपोर्टजवळ हे स्फोट झाले.