दैनिक भ्रमर : स्वातंत्र्यदिन म्हटला की देशासाठी बलिदान देणाऱ्या महात्म्याची आठवण भारतात प्रत्येकजण काढत असतो. त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतो. पण पाकिस्तानात मात्र स्वातंत्र्यदिनी केलेलं सेलिब्रेशन तिघांच्या जीवावर बेतलंय. पाकिस्तानचे प्रताप हे कायम जगावेगळेच राहिलेले आहे. पाकिस्तानमधील कराचीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान हवाई गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला, ज्यात एका ८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
पाकिस्तानी वृत्तवाहिनीनुसार, एका बचाव अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशा घटना संपूर्ण शहरात पाहायला मिळाल्या. अझीझाबादमध्ये अशाच प्रकारच्या हवाई गोळीबारात एक तरुणी जखमी झाली. याशिवाय कोरंगीमध्ये उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारात स्टीफन नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पाकिस्तानी वृत्तवाहिनीनुसार, शहरात अशा घटनांमध्ये ६० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.