पाकिस्तानकडून सीमा भागात रात्रभर गोळीबार
पाकिस्तानकडून सीमा भागात रात्रभर गोळीबार
img
Dipali Ghadwaje
पाकिस्तानी सेनेकडून जम्मू काश्मीर सीमेवर काल रात्री पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. अडीच वर्षानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. जम्मूच्या अरनिया आणि आरएसएसपुरा सेक्टरच्या बॉर्डरवर हा गोळीबार झाला आहे.  

गुरूवारी रात्री ८ वाजल्यापासून गोळीबाराला सुरुवात करण्यात आली होती. गोळीबारात बीएसएफचे एक जवान जखमी झाले आहेत. तसेच ४ स्थानिक रहिवाशी देखील जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून ५ चौक्यांवर गोळीबार झाल्याची माहिती बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिली.
 
मागच्या १० दिवसात पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा सिजफायरचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. घरातील दिवे बंद करून अंधारामध्ये घरात थांबा असं आवाहन येथील नागरिकांना करण्यात आलं आहे.
 
काल रात्री ८ वाजल्यापासून गोळीबाराला सुरुवात झाली होती. गोळीबारासह मोर्टारनेही हल्ला करण्यात आला आहे. मात्र हा हल्ला एका भिंतीवर झाल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आर्निया सेक्टरमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना घरामध्येच राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

काल देखील लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. यावेळी केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचलकांनी याबाबत माहिती दिली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर ही कारवाई करण्यात आलीये.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group