दैनिक भ्रमर : गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या ढगफुटीने अनेकांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडच्या चशोती भागात ढगफुटी झाल्यामुळे ६० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सीआयएसएफच्या दोन जवानांचा देखील समावेश आहे. ढगफुटीमुळे २०० जण बेपत्ता झाले आहेत. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न आहे.
किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर मचैल माता मंदिर मार्गावर दोन मिनिटांच्या आत दगड आणि मलबा मोठ्या प्रमाणात आला. नागरिकांना पळत जाऊन जीव वाचवण्याची देखील संधी मिळाली नाही. जो ज्याठिकाणी होता तिथेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला. मचैल माता मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील चशोती गावात गुरूवारी दुपारच्या सुमारास ढगफुटी झाली. मचेल माता मंदिरात यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक आले होते. या दुर्घटनेत ६० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.