राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झालं होतं. जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीत ढगफुटी सदृश्य पावस पडला आहे. मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्याने उपकेंद्र, घरे आणि शेती पाण्याखाली गेली.
गावाजवळील सातगाव डोंगरी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून, शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच आहे, पण अनेक ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली आहे.
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात आज दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. आता प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.