माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात चोरी झाली आहे. या चोरीमध्ये खडसे यांच्या घरातील मौल्यवान दागिने लंपास करण्यात आले आहेत. या चोरी प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. चोरीची घटना समजताच खडसेदेखील तातडीने त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानी गेले आहेत. असे असतानाच आता मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या बेडरुममध्ये ठेवण्यात आलेल्या काही सीडी आणि पेनड्राईव्हदेखील चोरून नेला आहे. भाजपा पक्षाला रामराम केल्यापासून माझ्याकडे फार महत्त्वाच्या सीडी आहेत. वेळ आल्यावर त्या बाहेर काढेन, असा दावा खडसे यांनी अनेकवेळा केलेला आहे. आता खडसे यांच्या घरातील चोरीमध्ये सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात माहिती स्वतः खडसे यांनी बुधवारी दुपारी पत्रकारांना दिली.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून सोने-चांदीसह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत सीडी, काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असलेली महत्वाची कागदपत्रेही चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी आता केला आहे. चोरटे नेमके कोणत्या उद्देशाने आले होते, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार खडसे यांनी चोरीच्या घटनेनंतर बंगल्यातील कपाटांमधून आणखी काही सामान चोरीला गेला आहे का म्हणून बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्यांना कपाटातून काही महत्वाच्या सीडी गायब झाल्याचे दिसून आले. त्या विषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. चोरट्यांनी चोरून नेलेल्या सीडी फार महत्वाच्या नसल्या तरी कामाच्या होत्या, असे ते म्हणाले.
सोने, चांदी आणि पैशांसोबत सीडी चोरून नेण्यामागे कोणाचा हात आहे का, तुम्हाला कोणावर संशय आहे का, असे प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारले. तेव्हा माझ्याजवळ पुरावे आहेत आणि ते आपण पोलिसांना स्वतःहून देणार आहोत, असे खळबळजनक स्पष्टीकरण त्यांनी दिले.