देशात लोकसभेसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघांमध्ये तर आश्चर्यजनक घडामोडी घडत आहेत. नेहमीप्रमाणे राजी-नाराजीचे सुर आहेत. अशा वातावरणात मुक्ताईनगरचे प्रसिद्ध खडसे घराण्याचं मात्र काही समजतच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला सून विरुद्ध सासरे असे चित्र असताना आता वडील विरुद्ध मुलगी असे चित्र जनतेला पाहायला मिळणार आहे.
एकनाथराव खडसे हे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. प्रबळ विरोधी पक्षनेता ते बारा खात्यांचे मंत्री अशी त्यांची ओळख असताना अचानक त्यांच्याभोवती विविध आरोप-प्रत्यारोप लावून तसेच खटले टाकून त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न पक्षांतर्गत करण्यात आल्याचे आरोप झाले. त्यांच्यामागे पुण्यातील भोसरी प्रकरण, दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी संभाषण प्रकरण यासोबत आता मुक्ताईनगरतील उत्खनन प्रकरण लावण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप खडसे यांनी केले होते. या सर्व घडामोडीत एकनाथराव खडसे यांच्या सून रक्षा खडसे ह्या दोन वेळा खासदार झाल्या. आता तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळाले आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोप प्रत्यारोपांना व खटल्यांना तसेच भाजप अंतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शरद पवार यांच्याशी हात मिळवणी केली.
मात्र सून रक्षा खडसे या भाजपामध्येच राहिल्या. त्यामुळे सुनबाई भाजपमध्ये तर एकनाथराव राष्ट्रवादीमध्ये होते. पण कधीही एकमेकांविरोधात त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेली नाहीत. आता त्यांच्यावर पुन्हा भाजपमध्ये जाऊन घरवापसी करण्याची वेळ आल्यावर मात्र आणखी एक बातमी समोर आली. एकनाथराव यांच्या कन्या व त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या ॲड. रोहिणीताई खडसे यांनी मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. त्यामुळे सून व सासरे भाजपामध्ये राहतील आणि त्यांची कन्या ही विरोधी पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात राहतील. या सर्व घडामोडी मध्ये खडसे घराण्याचे काही समजतच नाही बुवा.. अशा प्रतिक्रिया जनतेमधून उमटत आहेत.