आजकाल पहाटे, संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी केव्हाही शपथविधी होतच असतो ; नरेंद्र पाटलांचा अजित पवारांना टोला
आजकाल पहाटे, संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी केव्हाही शपथविधी होतच असतो ; नरेंद्र पाटलांचा अजित पवारांना टोला
img
Dipali Ghadwaje
जळगाव : भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या पाठचा ससेमिरा अद्याप गेलेला नाही. आता भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिला आहे.

एवढं सर्व प्रकरण झालेलं असताना धनंजय मुंडे हे कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेत होते. याचा अर्थ धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगत नरेंद्र पाटील यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नरेंद्र पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या दोघांचीही मागणी योग्य असल्याचं सांगत नरेंद्र पाटील यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपला सहकारी किंवा पार्टनर एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर, मुंडे यांनी लगेच बाजूला व्हायला हवं होतं, असा सल्लाही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

दमानिया, धस यांचे आरोप योग्यच

एवढं प्रकरण झालेलं असताना मुंडे हे वाल्मिक कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेत आहे. याचा अर्थ मुंडे हे कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचमुळे अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी अतिशय रास्त आहे. आता मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं नरेंद्र पाटील म्हणाले.

एका मंत्र्यासाठी शपथविधी होऊ शकतो

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर कुठलाही दबाव राहणार नाही. चौकशी चांगल्या पद्धतीने होईल. पारदर्शक होईल. तसेच या प्रकरणातील सत्यही बाहेर पडेल. प्रकरणातील सत्य बाहेर आल्यावर आणि निर्दोष असेल तर धनंजय मुंडे यांनी खुशाल परत मंत्रिपदाची शपथ घ्यावी, असं सांगतानाच आजकाल पहाटे, संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी केव्हाही शपथविधी होतच असतो. त्यामुळे एका मंत्र्यासाठी पुन्हा शपथविधी होऊ शकतो, असा टोला त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group