राज्यातील विविध महापालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी मतदानाची टक्केवारी ३० टक्क्यांच्या पुढे गेल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला असला, तरी काही ठिकाणी वादाची परिस्थिती देखील निर्माण झाली. दरम्यान जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाला असून दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा पिंप्राळा परिसरात दाखल झाला. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणांचाही शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पिंपराळा भागातील रहिवासी असलेले सचिन आणि मुस्तफा नामक तरुणांमध्ये आर्थिक विषयावरून वाद होता. त्यातून गोळीबारची घटना घडलेली आहे. या घटनेचा मतदानाशी काहीही संबंध नाही. दरम्यान, जनतेने निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी केले आहे.