एरंडोल येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अमळनेर नक्याजवळ भीषण अपघात झाला. यात रात्री घरी जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या दोघांना भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुचाकीला धडक दिल्यानंतर टँकरसह चालक फरार झाला असून अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला.
मिळालेल्या माहितीनुसार , राजेंद्र भिला भोई (वय ४६) आणि दीपक रामकृष्ण भोई (वय ४४, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे दोघे दुचाकीवरून जात होते. याचवेळी जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाल्याने जखमींला ग्रामीण रुग्णालयात नेत असताना, त्याचाही मृत्यू झाला.
अपघातात मृत झालेले दोघेही जवळचे नातेवाईक होते. बसस्थानकापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर अपघात झाल्यामुळे नागरिकांनी अपघातस्थळी लागलीच गर्दी करून मदत कार्य सुरू केले. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .