पुण्यातील ससून रुग्णालयात तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. एका तरुणाने तरुणींच्या साथीने ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घातला. त्यांनी प्रवेशद्वाराची काच फोडली. ईसीजी मशिनची देखील तोडफोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तोडफोड रोखण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षकाला धमकावले, त्याच्याशी धक्काबुक्की केली. ससून रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी स्वप्नील धनगर (वय २५) आणि राणी पाटील (वय २५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय कामात अडथळा आणणे, सरकारी वास्तूची तोडफोड करणे यासाठी दोघांवर कारवाई होणार आहे. सुरक्षारक्षक संदीप जाधव यांनीही दोघांवर मारहाणीप्रकरणी तक्रार दिली आहे.
नेमकं काय प्रकरण?
ससून रुग्णालयात आरोपी स्वप्नील धनगर आणि राणी पाटील यांचे नातलग उपचार घेत आहे. मंगळवारी (१५ जुलै) दुपारी एक वाजताच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ४० येथे दोघे आले होते. दोघांना त्यांच्या नातलगाला भेटायचे होते. पण नातेवाईकांना भेटण्याची ठराविक वेळ असते. त्यामुळे आता तुम्हाला जाता येणार नाही, असे सुरक्षारक्षक जाधव यांनी दोघांना सांगितले.
नातलगाला भेटण्यासाठी परवानगी नाकारल्याने स्वप्नील धनगर आणि राणी पाटील या दोघांनी रुग्णालयात राडा करायला सुरुवात केली. गोंधळ घालू नका असे सांगूनही ते दोघे ऐकले नाही. त्याने सुरक्षारक्षक संदीप जाधव आणि त्याच्या साथीदारांना धक्काबुक्की केली, शिवीगाळ देखील केले. दोघांनी काठीने जाधव यांना मारहाण केली.
प्रवेशद्वाराची काच फोडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना नोटीस बजावली आहे. लवकरच दोघांवर कारवाई होईल असे म्हटले जात आहे.