५० तोळे सोने अन् ३५ लाख रु रोख, गर्भलिंग तपासणी अन् गर्भपात ! इंजिनियर विवाहितेची सासरच्यांना कंटाळून आत्महत्या
५० तोळे सोने अन् ३५ लाख रु रोख, गर्भलिंग तपासणी अन् गर्भपात ! इंजिनियर विवाहितेची सासरच्यांना कंटाळून आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता पुन्हा एकदा हीच पुनरावृत्ती पुण्यात पहायला मिळाली आहे. पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दीप्ती मगर चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या विवाहिची सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती देखील पुढे आली आहे.  या प्रकरणी मृत दिप्तीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिला होत असलेल्या मानसिक तसेच शारिरीक त्रासाचा पाढा वाचला आहे, तर तिच्या सासरच्या मंडळीची विकृत मानसिकतेतून तिला गर्भपात देखील करायला लावल्याचं संतापजक सत्य समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती आणि रोहन चौधरी यांचा विवाह २३ नोव्हेंबर २०१९ रोजी थेऊर येथे पार पडला होता. लग्नानंतर अवघ्या महिनाभरानंतरच दीप्तीच्या आयुष्यातील संघर्ष सुरू झाला. तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तसेच, 'तू दिसायला सुंदर नाहीस, तुला स्वयंपाक आणि घरकाम जमत नाही, त्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बाया बऱ्या,' असे टोमणे मारून सासरच्यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला.

दीप्तीला पहिली मुलगी झाल्याने सासरची मंडळी नाराज होती. दरम्यान, पती रोहन याने एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडल्याचे कारण पुढे करत माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली. मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आई-वडिलांनी ही रक्कम दिली. मात्र, त्यांची हाव इथेच थांबली नाही. लग्नात गाडी दिली नाही यावरून टोमणे मारत, रोहनने चारचाकी गाडी घेण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली. मुलीचा संसार टिकावा म्हणून माहेरच्यांनी पुन्हा तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. 50 तोळे स्त्रीधन बळकावले. लग्नात दीप्तीला माहेरून सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून देण्यात आले होते. ग्रामीण भागात चोरीची भीती दाखवून सासू आणि पतीने हे सर्व दागिने काढून घेतले. पुढे विचारणा केली असता, हे दागिने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचं तिला सांगण्यात आलं.

नोव्हेंबर 2025 मध्ये दीप्ती 5 महिन्यांची गर्भवती असताना, सासरच्यांनी तिला 'आम्हाला वंशाला दिवा हवा आहे', असं सांगत गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडले. पोटातील बाळ मुलगी असल्याचं समजताच, दीप्तीचा विरोध झुगारून तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. या घटनेने दीप्ती पूर्णपणे खचली होती.ऑक्टोबर 2025 मध्ये सासू सुनीता चौधरी या सरपंच झाल्या. निवडणुकीत मोठेपणा मिरवण्यासाठी आणि सासूच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी दीप्तीकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यावर पती, सासू, सासरे आणि दीर यांनी तिला मारहाण केली. तसेच, माहेरच्या रो-हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. अखेर या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून 25 जानेवारी रविवारी रोजी रात्री दीप्तीने गळफास घेतला. आता या प्रकरणाचा उरुळी कांचन पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group