पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रूट स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर मॅनेजरसह महिलेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी खिडकीतून उडी मारण्याच्या प्रयत्नात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर स्पा सेंटर मधील मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील रूट स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. विमाननगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’वर पोलिसांनी छापा टाकताच महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विमाननगर पोलिस स्टेशनच्या पथकाने दुपारी सुमारे तीनच्या सुमारास स्पा सेंटरवर कारवाई केली. अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. संबंधित ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली होती. या प्रकरणी व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.