टायर फुटल्याने भीषण अपघात, नियंत्रण सुटलेली क्रूझर ट्रकला धडकली, ३ कामगारांचा जागीच मृत्यू
टायर फुटल्याने भीषण अपघात, नियंत्रण सुटलेली क्रूझर ट्रकला धडकली, ३ कामगारांचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. धक्कादायक म्हणजे टायर फुटल्याने क्रूझर थेट दुसऱ्या लेन मध्ये जाऊन ट्रकला धडकली. या भीषण अपघातात ३ कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात हा अपघात झाला. 

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. एक क्रूझर गाडी कामगारांना घेऊन जात असताना लोणी देवकर एमआयडीसीच्या हद्दीत अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि ही गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेकडून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. दोन्ही गाड्यांची समोरासमोर झालेली धडक इतकी जोरदार होती की, क्रूझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या भीषण धडकेत गाडीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group