उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भक्तीच्या वातावरणात बुडालेल्या वृंदावनमध्ये आज एका भीषण दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. यमुनेच्या पात्रात भाविकांनी भरलेली एक बोट (स्टीमर) उलटली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बोटीमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते. यातील अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी हा भीषण अपघात घडला आहे.
वृंदावन येथील प्रसिद्ध केशी घाटावर ही घटना घडली. पंजाबमधील भाविकांनी भरलेला एक स्टीमर यमुनेतून जात असताना पांटून पुलाला धडकल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की स्टीमर क्षणात पाण्यात उलटला. यानंतर भाविकांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत कार्यात वेग आणण्याचे निर्देश दिले असून, मृतांच्या वारसांना योग्य भरपाई जाहीर केली आहे. सध्या गोताखोरांच्या मदतीने बेपत्ता भाविकांचा शोध घेतला जात आहे.दरम्यान बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. 30 पेक्षा जास्त भाविक या बोटीत होते. त्यांच्या पैकी सहा जणांचा मृतदेह आतापर्यंत मिळाले आहेत. इतर भाविकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक पंजाबचे रहिवासी होते. केशी घाटाजवळ त्यांचा स्टीमर एका पुलाला धडकला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. स्थानिक नागरिक आणि गोताखोरांनी प्रसंगावधान राखत अनेकांना पाण्याबाहेर काढले आहे, मात्र अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून अधिकाऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना केल्या आहेत.