भविष्य कोणी बघितलं नाही ना ते कोणाला बघता येतं. तसं झालं असतं तर अनेक दुर्दैवी घटना थांबवता आल्या असत्या. काहींसोबत नियती देखील क्रूर खेळ खेळते. मालाडमध्ये घडलेली घटना दगडालाही पाझर फोडणारी असली तरी नियतीने मात्र सिंग कुटुंबासोबत क्रूर खेळ खेळलाच अन डाव साधलाच.
मालाडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या चिमुकल्यासाठी त्याच्या आई वडिलांनी २० वर्ष वाट पहिली होती. लग्नाच्या २० वर्षानंतर या मुलाचा जन्म झाला होता.लक्ष्य सिंग असं अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.
मुंबईतील मालाड पूर्वेकडील निलयोग विराट बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. सिंग यांच्या कुटुंबात ५ तारखेला लग्न होते. ६ तारखेला संपूर्ण कुटुंब एकत्र होते आणि ७ तारखेला सकाळी त्यांचा चार वर्षांचा मुलगा लक्ष्य इमारतीच्या खाली खेळत होता.सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलगा इमारतीच्या आत फिरताना दिसत आहे. मुलाला गाडीने धडक दिल्यानंतर थोडे अंतर गेल्यावर गाडी थांबते. मग इमारतीचा सुरक्षा रक्षक मुलाला उचलून रुग्णालयात घेऊन जाताना दिसतो. भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कारने चार वर्षांच्या निष्पाप लक्ष्यला धडक दिली आणि इनोव्हा कारचा चालक अपघाताची माहिती सुरक्षा रक्षकाला दिल्यानंतर तेथून पळून गेला.
लक्ष्यच्या वडिलांनी सांगितलं की, “अपघातानंतर जर कार चालकाने माझ्या मुलाला ताबडतोब रुग्णालयात नेले असते, तर कदाचित तो वाचला असता”. अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीला जामीन देणार होते. पण आम्हाला हे कळताच, संपूर्ण कुटुंब पोलिस ठाण्यात गेले आणि त्याला जमीन देण्यापासून रोखले” जयप्रकाश सिंह यांनी आरोप केला की “कार चालकाने केवळ अपघात घडवून आणला नाही तर त्यांच्या ४ वर्षांच्या निष्पाप मुलाला गाडीसोबत ओढून नेले” हिट अँड रनचा आरोप करत त्याने कठोर कारवाईची मागणी केली.
दिंडोशी पोलिसांनी सांगितले की “त्यांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे आणि इनोव्हा कार चालक रमेश देवजी जतरारा याला अटक केली आहे”