कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा कार–दुचाकीच्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास झरी गावाजवळ घडली. या घटनेमुळे जिंतूर तालुक्यातील बोर्डी व मुडा परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात हभप. प्रसादराव कदम (४५, रा. बोर्डी ता. जिंतूर), हभप. माऊली दिगंबरराव कदम (३०), (रा. बोर्डी ता. जिंतूर), हभप. दत्ता माणिकराव कऱ्हाळे (३०, रा. मुडा, ता. जिंतूर) यांचे निधन झाले आहे.
तिघे वारकरी परभणीतील पिंपळामधील कीर्तनसाठी गेले होते. गावातील कीर्तन आटोपल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास तिघेही दुचाकीने परभणी- जिंतूर मार्गाने बोर्डी गावाकडे निघाले होते. झरी गावाजवळच्या लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येतात काळाने घाला घातला. महाराजांच्या दुचाकीला कारने जोरात धडक दिली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.
मध्यरात्री अपघाताची माहिती मिळतच पोलिसांनी झरी गावात धाव घेतली. शंकर हाके यांनी तात्काळ या अपघातात तिघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केले. पण उपचारावेळी तिघांचा मृत्यू झाला. अध्यात्मिक कार्यात सक्रिय असलेल्या तरुण वारकऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे.
तर दुसरीकडे आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. रत्नागिरी शहरालगतच्या भाटी मिऱ्या येथे भीषण अपघात झाला आहे. दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.