नृत्यांगना गौतमी पाटील विविध कारणामुळे कायमच चर्चेत असते. बैलासमोरचा नाच असो किंवा नाच करताना अश्लील हावभाव असो गौतमी पाटील या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे त्याच कारण म्हणजे अपघात. ३० सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षा चालकाला तिच्या कारने जोरात धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या गौतमी पाटीलच्या चालकाला काही तासातच अटक करण्यात आली. दरम्यान अपघात झाला त्या ठिकाणीचे सीसीटीव्ही चित्रण प्रसिद्ध करावे आणि गौतमी पाटीलला अटक करावी, या मागणीसाठी अपघातग्रस्त रिक्षाचालकाचे कुटुंबिय आणि शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने सिहंगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले.
दरम्यान या आंदोलनानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत गौतमीवर कारवाईची मागणी केली. पाटील यांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला. फोन केल्यानंतर ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. अपघातग्रस्त कुटुंबाचा वैद्यकीय खर्च वाढला असून त्याबद्दल लवकर न्याय करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
अपघात झाला तेव्हा गौतमी गाडीत होती की नाही हे मात्र अस्पष्ट आहे. गौतमी पाटील विरोधात आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत जरी नसली तरी तिची जबाबदारी संपत नाही. तिच्या नावावर गाडी असल्यामुळे ती सुद्धा आरोपीच आहे.
तर रिक्षाचालकाच्या मुलीने सांगितले की, गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत होती की नाही? याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. आता सुरू असलेले प्रकरण प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी सीसीटीव्ही किंवा इतर पुरावे सादर केलेले नाहीत.
अपघात झाल्यापासून आतापर्यंत गौतमी पाटीलच्या वतीने आमच्या कुटुंबाशी साधा संपर्कही केलेला नाही, असेही अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या मुलीने एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.