बीसीए, बीबीएला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील अडचणीबाबत मुंबईत बैठक पार पडली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
या चर्चनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय की, बीसीए बीबीए प्रवेश पूर्ण होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 25-26 साठी पुन्हा सीईटी होणार आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या.
अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली नव्हती, त्यामुळे ते प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. अखेर या समस्येचा तोडगा उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी काढला आहे.
मंत्री पाटील यांच्या दालनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, प्राचार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली.
या बैठकीसाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष प्रताप माने, प्राचार्य डी आर मोरे, प्राचार्य व्ही एम पाटील, अॅड. धैर्यशील पाटील उपस्थत होते.
या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्यात आला. शक्य तितके लवकर सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. त्यांना योग्य वाटचाल करता यावी, यासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
बीसीए बीबीए या अभ्यासक्रमासंदर्भात ज्या अडचणी आहेत, त्याबाबत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे संलग्नीकरण शुल्क आणि अनामत रक्कम कमी करण्यासाठी सरकारच्यावतीने शिफारस करण्यात येईल. त्यासाठी एआयसीटीई चेरअमन यांची संस्थाचालकांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेणार आहेत, असं देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.