दैनिक भ्रमर : मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला सार्थ ठरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. मुलींसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये आता आणखी एक योजना आखण्याची तयारी सरकार करत आहे.
'देशात शिक्षित पुरुषांचे प्रमाण ८१ टक्के असून महिलांचे प्रमाण फक्त ६० टक्के आहे. महिलांनी उच्च शिक्षण घेण्यास कचरू नये, यासाठी आम्ही ८४२ अभ्यासक्रमांना विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफी दिली आहे. तरीही शैक्षणिक संस्था 'विकास शुल्क,' 'प्रयोगशाळा शुल्क' अशी विविध 'इतर शुल्क' आकारत असल्याने विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळा येतो.
हा विचार करून आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थिनींना या 'इतर शुल्कां'पासून दिलासा देण्याची योजना आखत आहे. त्यामुळे लवकरच या इतर शुल्कापासूनही विद्यार्थिनींची मुक्तता होईल', अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सिडनहॅम महाविद्यालयात यास्मिन खुर्शीदजी सर्वेअर यांच्या पदवी शताब्दी सोहळ्यात ते उपस्थित होते. यावेळ शिक्षण शुल्क माफीची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात मुलींसाठी शिक्षण आणखी सोपे होणार आहे.