13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात! अंतिम वर्षातील फेल विद्यार्थ्यांनाही देता येणार ‘एंन्ट्रन्स’
13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात! अंतिम वर्षातील फेल विद्यार्थ्यांनाही देता येणार ‘एंन्ट्रन्स’
img
Dipali Ghadwaje
सोलापूर : पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी लागू झालेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही लागू होणार आहे. पदवीच्या अंतिम तथा तृतीय वर्षात शिकणाऱ्या, पण एक-दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना नवीन धोरणानुसार पुढील प्रवेशासाठी एंन्ट्रन्स देता येईल, फक्त प्रवेश अंतिम होण्यापूर्वी विद्यार्थ्याचा निकाल लागून त्यात तो उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या विषयातून शिकता येणार आहे. पदवीला प्रवेश घेतल्यानंतर एक-दोन वर्षानंतर संबंधित विद्यार्थ्याने मधूनच महाविद्यालय सोडल्यास त्या विद्यार्थ्यास एक-दोन वर्षाचे देखील स्वतंत्र प्रमाणपत्र मिळणार आहे. पदवी झालेल्या विद्यार्थ्याने पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतल्यानंतर त्याला पुढे पीएचडीची संधी मिळणार आहे. दरम्यान, पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी देखील नवीन धोरण लागू होणार असल्याने सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या, पण एक-दोन विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही त्या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच वर्षी पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेता येणार आहे. 

त्यासाठी विद्यापीठाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा वेळेत व निकालही वेळेत लावल्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हा त्यामागील हेतू असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले.

निवडणुकीमुळे परीक्षेला तीन दिवस सुट्टी

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार असून निवडणुकीसाठी विद्यापीठासह महाविद्यालयांमधील बहुतेक कर्मचाऱ्यांना ड्यूटी आहे. त्यामुळे ६ ते ८ मे या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कोणताही पेपर ठेवलेला नाही. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान, निवडणूक प्रशिक्षणामुळे ८ एप्रिल रोजी रद्द करावा लागलेला पेपर १२ मे रोजी घेतला जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

आगामी शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ १३ जूनपासून विद्यापीठासह संलग्नित उच्च महाविद्यालयांचे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची सुरवात १३ जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा संपल्यानंतर १३ जूनपूर्वीच सर्व निकाल लावण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे नियोजन झाल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितले. यंदापासून पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्याचा अभ्यासक्रम देखील निश्चित झाला असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातून शिक्षण घेण्याची नामी संधी यानिमित्ताने उपलब्ध होत असल्याचेही डॉ. अंधारे यांनी यावेळी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group