महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रविवार, 1 डिसेंबर रोजी पार पडली. या परीक्षेसाठी दोन पेपर उमेदवारांना सोडवावे लागतात.
त्यापैकी पेपर दोन हा कलचाचणीचा पेपर असतो, त्यामध्ये काम करताना एखादा उमेदवार काय विचार करून निर्णय घेतो हे तपासण्यात येतं. त्याच पेपरमध्ये एक असा प्रश्न विचारण्यात आला होता की त्यावरून भावी अधिकाऱ्यांची विचारक्षमता नक्की कशी हवी आहे, त्यांनी नेमका काय, कसला विचार करणे अपेक्षित आहे असे प्रश्नच अनेकांना पडले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी ( 1 डिसेंबर) महाराष्ट्र राजपत्री नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. त्या परीक्षेत चक्क मद्यपानावर प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न आणि त्याच्या उत्तरासाठी देण्यात आलेल्या पर्यायांची सध्या चर्चा सुरू आहे.
काय होता तो प्रश्न ?
तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल ? असा प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता.
पर्याय....
1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांना मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
2) दारू पिण्यास नकार देईन.
3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करत आहेत म्हणून मद्यपान करेन.
4) नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.
हा प्रश्न आणि त्याच्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांनी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकलं. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे भविष्यातील शासनाचे क्लास वन अधिकारी असतील. त्यामुळे या परीक्षेत दारूसंबंधी प्रश्न विचारायला नको होता. हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय ? असा सवाल सध्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. समाज माध्यमांवर सध्या या प्रश्नाची चर्चा सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.