दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागानं यंदाच्या परिक्षेतील गैरप्रकारांना रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. बोर्डाच्या परीक्षेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर कॉपी केली तर तुमची खैर नाही. कारण परीक्षा देताना तुमच्या सगळ्या हाचलाली आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण खात्यानं मोठा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे बोर्डाच्या परिक्षेत कितीही उपाय केले तरी सर्रास होणारे कॉपीचे प्रकार यंदा मात्र होणार नाही. कारण कॉपी मुक्त परिक्षा घेण्यासाठी यंदा शिक्षण विभागानं विशेष काळजी घेतलीये. आता १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेवर थेट कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
10, 12वी कॉपी बंद, व्हिडिओ सुरू
- कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार
- परिक्षांचं फुटेज निकालापर्यंत जतन करुन ठेवणार
- विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेत बदल केल्यास कारवाई होणार
- पर्यवेक्षकांनी एकाच ठिकाणी उभं न राहता फिरत राहणं आवश्यक
- शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करणार
दहावी बारावीच्या परिक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आता शिक्षण विभागानं आदेश काढत सोयी सुविधा आणि सीसीटिव्ही आहे की नाही याची पडताळणी करण्याचं ठरवलंय. त्यामुळे परिक्षेतील हे गैरप्रकार रोखले जातील असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय. असं असलं तरी या निर्णंयाची राज्यात अंमलबजावणी कशी होणार आणि यामुळे कॉपी रोखण्यात किती यश येणार याबाबत आता उत्सुकता आहे .