महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शासनाने विशेष बाब म्हणून वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची वाढ केल्याने एमपीएससीने हा निर्णय घेतला आहे. तेव्हा वयाधिक उमेदवारांना ६ जानेवारी २०२५ पर्यंत परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही ठराविक जिल्हा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे. राज्य सरकारने वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे एमपीएससीद्वारे 'गट ब आणि गट क'च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
आधी ५ जानेवारी २०२५ रोजी 'महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४' होणार होती. आता ही परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. तर 'महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४' २ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार होती. ती आता ४ मे २०२५ ला होणार आहे.
एमपीएससीच्या परीक्षांसाठी वयाधिक उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. ६ जानेवारी २०२५ पर्यंत इच्छुक वयाधिक उमेदवार अर्ज करु शकतात. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये यासंबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केल्यानुसार, 'महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४' आणि 'महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४' या परीक्षांसाठी नव्याने अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांना ठराविक सहा जिल्हा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये नवी मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांचा समावेश आहे. उमेदवार या जिल्हा केंद्रांवरील उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.