इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) : इगतपुरी तालुक्यातील भांगरेवाडी या रस्ता नसलेल्या आदिवासी वाडीची व्यथा येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य बिघडवणारी ठरत आहे. खडकेद जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ली ते 8 वी इयत्तेत शिकणार्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी वाहणारी नदी ओलांडून जीव मुठीत धरून जावे लागते आहे.
हे ही वाचा
नदीला पाणी कमी असले तरच शाळेत जाण्यासाठी संधी मिळते, अन्यथा या विद्यार्थ्यांना आठ-दहा दिवसांची अघोषित सुट्टी मिळते. यामुळे या आदिवासी वाडीमध्ये शिक्षणाचा बट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. या वाडीला रस्ता नसल्यामुळे जेमतेम शिक्षण झाल्यावर अर्धवट शिक्षण सोडावे लागते. उच्च शिक्षण करणारे सध्यातरी येथे कुणीही नाही. धक्कादायक म्हणजे येथील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्णपणे थांबलेले आहे. पहाटे 5 वाजता उठून नदी ओलांडून कॉलेज गाठणे कठीण असल्याने मुलींनी शिक्षणाचा नाद सोडला आहे.
हे ही वाचा
याहीपेक्षा विशेष बाब म्हणजे या आदिवासी वाडीत बालकांची संख्या मोठी असूनही अंगणवाडी नाही. परिणामी नदी ओलांडून गावातल्या अंगणवाडीत कोणीही बालक पाठवले जात नाही. आदिवासी ग्रामस्थांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जोरात वाहणारी नदी, रस्त्यावर वाहणारे पाणी, चिखलातून वाट काढणार्या ग्रामस्थांचा केविलवाणा संघर्ष कधी संपेल याची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने भांगरेवाडीवरील अन्याय दूर करण्यासाठी पावले उचलावित, अशी मागणी गुणाजी खतेले यांनी केली आहे.