इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) :- आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट द्यायचं नसेल, तर देऊ नका; पण सध्याच्या विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या मुद्यावरून होणारी बदनामी थांबवा, अशी मागणी करीत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून आता इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील वार-प्रतिवाराचे राजकारण आता तापले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमधून उभे राहिलेले शे. का. प. चे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. मतदानात काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय या आमदारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते.
क्रॉस व्होटिंग करणार्या संशयित आमदारांमध्ये काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे नाव चर्चेत होते; मात्र यावर खोसकर यांनी स्पष्टीकरण देत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेली बदनामी थांबली पाहिजे. वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन बदनामी थांबवली पाहिजे, असे सांगून कोणत्या आमदारानं कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं, हे ठरलं होतं, त्यानुसारचं मतदान केल्याचे हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर थेट आरोप केले आहेत. नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. शपथ घेऊनही त्यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप केले. तसेच नाना पटोले यांनी मतदारसंघात काय चाललंय, याबद्दल कधीच विचारलं नाही, असं म्हणत खोसकर यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली.्र
तिकीट द्यायचं नसल्यास देऊ नका. पण बदनाम करू नका. याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार आहे. तसेच पक्ष श्रेष्ठी बदनामी करत आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार अध्यक्षांवर नाराज असून त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. याबद्दल शपथ घेऊन सांगितलं, तरीदेखील माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. ज्यांची मतं फुटली, त्या सहा जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊनसुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आले, अशी नाराजी व्यक्त करत हिरामण खोसकर यांनी नाना पटोले यांच्याविरोधात संताप व्यक्त केला.