इगतपुरी (भास्कर सोनवणे ) : मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडणार आहेत. गेली ७० वर्ष पुरावे सापडत नव्हते. आता राज्यातील सगळ्या जिल्ह्यात १८०५ ते १९६७ पर्यंतचे जुने पुरावे सापडत आहेत. ज्यात आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शासनाची सुटका नाही.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी इगतपुरी तालुक्यातील शेणित येथे सभेत व्यक्त केला.
सकल मराठा समाज आणि परिसरातील ६७ गावांनी ह्या सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव हजर होते. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना लगेच दाखले वाटप सुरू आहे. त्यामुळे आरक्षण दृष्टीक्षेपात आले आहे. म्हणून आता मागे हटू नका, एकजूट कायम ठेवा. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, २४ डिसेंबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबर नंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, पण त्याच्या आधी १ डिसेंबर पासून शांततामय मार्गाने गाव तिथे साखळी उपोषणाची तयारी करा असे आवाहन त्यांनी यावेळी समाजबांधवांना केले. उपस्थित बांधवांनी यावेळी विविध घोषणाबाजी करून लक्ष वेधले.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आरक्षणाची लढाई आपण ७० टक्के जिंकलोय. कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, ओबीसी समाज बांधवांशी वाद घालू नका. भांडू नका. राजकीय स्वार्थासाठी तणाव निर्माण होऊ देऊ नका. आरक्षणासाठी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. कच खाऊ नका, आरक्षणासाठी एकजूट ठेवा, राजकारण बाजूला ठेवा, आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, मी तुमच्या जिवावर लढतोय. जिवाची पर्वा न करता मी या लढ्यात उतरलो आहे. कारण मला मराठ्यांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे.
गेली ७० वर्ष आरक्षण नसल्याने मराठा समाजाचे झालेले मोठे नुकसान यापुढे होऊ देणार नाही. माझ्या बांधवांसाठी एकदा आरक्षण मिळू द्या. मी नेहमीच मराठा समाजाची वेदना मांडतो म्हणून शासनासह सर्वांनी मला शत्रू मानले असले तरी मी त्याला फारसे महत्व देत नाही. मराठा आंदोलनाला राज्यातील मराठ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आजची शेणित येथील सभा याचेच प्रतीक आहे. आरक्षण सोपा विषय नाही, जितकी जमीन जागा महत्वाची तितकेच आरक्षण महत्वाचे.
त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत घ्यायचेच असेही असेही ते म्हणाले. ह्या सभेला आलेल्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, नाश्ता, चहा, पाणी, शौचालये, आरोग्य व्यवस्था आदींचे उत्तम व्यवस्थापन आयोजकांकडून करण्यात आले होते. हजारो स्वयंसेवकांनी त्यांना सोपवलेली जबाबदारी उत्तम पार पाडली. यावेळी वाडीवऱ्हे, इगतपुरी, घोटी, देवळाली कॅम्प आणि सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.