"आमची माणसं मरत आहेत आणि तुम्ही मजा बघत आहेत" - मनोज जरांगें पाटील
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केलंय. त्यांनी नुकतंच ३० जानेवारीला आमरण उपोषण स्थगित केलं होतं. आता थेट मुंबईत घुसणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करत आहेत, तर दुसरीकडे मराठी आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरूणानं आपलं आयुष्य संपवलंय.

मिळालेल्या माहितीनुसार , शेततळ्यात उडी मारून तरूणानं आरक्षणासाठी जीव दिलाय. तरूणाच्या मृत्यूनंतर जरांगे पाटलांनी आत्महत्या करू नका आपण लढू, असं भावनिक आवाहन केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथे एका तरूणानं मराठा आरक्षणासाठी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वी त्यानं चिठ्ठी लिहिलीय. त्यात त्यानं आरक्षणासाठी फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक साद घालत, आरक्षणासाठी एकत्र लढू असं म्हणत तरूणांना आत्महत्या न करण्याच आवाहन केलं आहे.

कृपया करून आत्महत्या करू नका 'आरक्षण १०० टक्के मिळणार आहे. समाजासाठी मी कायम काम करणार आहे. जिव्हारी लागेल असं कुणीच काही करू नका. बीड, जालन्यात मराठा आरक्षणासाठी तरूण वर्ग आत्महत्या करीत आहेत. कृपया करून आत्महत्या करू नका. आपण लढू. थोडासा विचार करा. आरक्षण मिळेपर्यंत मी हटणार नाही', असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

'या घटनेनंतर सरकारला काहीच वाटत नाही का? गोर गरीबांची लेकरं आत्महत्या करीत आहेत. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला किती बळी घ्यायचेत. या आत्महत्या राजकारणासाठी होत नाहीत. नोकरीसाठी लेकरं आत्महत्या करीत आहेत. लेकरांच्या आत्महत्या या त्यांच्या नोकरीसाठी होत आहे', असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

'मुख्यमंत्री साहेब इतकी मग्रुरी येते कुठून? नाईलाजाने तुम्हाला जेरीस आणण्यासाठी आंदोलन करावं लागेल. आमचा संयम सुटत चालला आहे. आमची माणसं मरत आहेत आणि तुम्ही मजा बघत आहेत. उद्या कॅबिनेट मीटिंग आहे त्यात निर्णय घ्या', अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group