भरधाव वाहनाने चौघांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू
भरधाव वाहनाने चौघांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू
img
दैनिक भ्रमर


अकोला (भ्रमर वृत्तसेवा) :- अकोला-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा जवळ वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. 

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय राज्य महामार्गावरील पैलपाडा गावाजवळ चायनीज व्यवसाय करणारे बोरगाव मंजू भीमनगर येथील धिरज सिरसाठ, अश्‍विनी सिरसाठ हे कारंजा तालुक्यातील खेर्डा या गावातून आपल्या व्यवसायाचे काम आटोपून चारचाकी गाडीने जात असताना त्यांची गाडी अचानक कुरणखेड जवळ बंद पडली.

गाडी बंद पडल्याचे समजताच त्यांनी बोरगाव मंजू येथीलच एका मालवाहतूक गाडीने गाडी टोचन करून घेऊन जात होते. या दोन्ही गाड्या कुरणखेड आणि पैलपाडा गावच्या मध्यात महामार्गावर थांबल्या. गाडीतून उतरून गाडीचे टायर पाहत असताना भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारही व्यक्तींना उडवले.

या दुर्घटनेत अश्‍विनी शिरसाट, धिरज सिरसाठ हे  पती-पत्नी तर आरिफ खान हे जागीच ठार झाले. तर अन्वर खान हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकातर्फे अपघातामधील गंभीर जखमी अन्वर खान यांना मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात गाडीचा चालक अद्याप पसार आहे.

पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. पोलिसांच्या सूचनेवरून अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह आपत्कालीन बचाव पथकाच्या सदस्यांनी अ‍ॅब्युलन्सच्या मदतीने उर्वरित तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group