हृदयद्रावक ! मुक्तिधामसमोर विचित्र अपघातात मायलेकींसह जन्मापूर्वीच बाळाचाही मृत्यू
हृदयद्रावक ! मुक्तिधामसमोर विचित्र अपघातात मायलेकींसह जन्मापूर्वीच बाळाचाही मृत्यू
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : येथील मुक्तिधाम मंदिरासमोरील रस्ता नेहमीच अतिक्रमण व वाहतुकीच्या कोंडीमुळे धोकादायक ठरतो. नागरिक रोजच जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करीत असतात. अशाच या गजबजलेल्या रस्त्यावर काल सायंकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. आई व गरोदर मुलगी रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात 50 वर्षीय आईचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या गरोदर मुलीचा व बाळाचादेखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, बिटकोहून मालधक्का रोडकडे जाणारा एमएच 04 ईएल 0446 या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात येत होता. नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने प्रथम होंडा सिटी कारला धडक दिली. त्यानंतर बाजूला उभ्या दोन रिक्षाही उडविल्या व रस्ता ओलांडणार्‍या मायलेकींवर गाडी चढविली. जखमींना नागरिकांनी तत्काळ बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच सुनीता भीमराव वाघमारे (वय 50) यांनी जगाचा निरोप घेतला. या अपघातात त्यांची आठ महिन्यांची गरोदर असलेली मुलगी शीतल प्रेमचंद केदारे (वय 27, रा. मखमलाबाद, नाशिक) हिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दारुण पराभव ! बेस्ट पतपेढीचा निकाल समोर; ठाकरे बंधूंच्या पॅनलचा धुव्वा

या अपघातामुळे शीतलचे बाळ काल रात्रीच दगावले आणि आज उपचारादरम्यान शीतलचाही मृत्यू झाला. शीतल ही आठ महिन्यांची गरोदर होती. बाळंतपणासाठी ती माहेरी आलेली होती. अपघातानंतर मुक्तिधाम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अतिक्रमण व वाहतुकीच्या गोंधळामुळे निष्पाप मायलेकीला व जन्माला येण्यापूर्वीच बाळाला प्राण गमवावे लागले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. या अपघातामुळे संपूर्ण नाशिकरोड परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष गायकवाड करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group