दैनिक भ्रमर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणी सुरु होण्यास उशीर झाला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे.
या निवडणुकीत ठाकरे बंधुंना दारूण पराभव सहन करावा लागला आहे. या निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी मतदान झाले होते, ज्यापैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनेलला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेआधी ठाकरे बंधुंना हा मोठा धक्का मानला जात आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या श्रमिक पॅनेलचे ७ उमेदवार विजयी झाले तर शशांक राव यांच्या पॅनलने १४ जागा जिंकल्या. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत 'उत्कर्ष पॅनेल'ची स्थापना केली होती. मात्र या पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे बंधुंवर निशाणा साधला आहे.