गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. घरपोहोच वस्तूही अगदी सहज पोहोचत असल्याने अनेक जण ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडतात. पण अनेकदा ऑनलाईन शॉपीग करताना फसवणूक झाल्याचे देखील उघड झाले आहे. खराब वस्तू मिळणे किंवा चुकीची वस्तू मिळणे आणि त्यासोबतच आता बँक खातेही रिकामे होण्यास सुरुवात या ऑनलाईन शॉपिंग मुळे झाली आहे. खार पश्चिमेतील खार दांडा परिसरात राहणाऱ्या साहिल शेख याला देखील याचा अनुभव आला आहे.
मोबाइलवरून ऑनलाइन शॉपिंग करणे साहिल शेखला चांगलेच महागात पडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, साहिल शेख याने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एक स्लीपर आणि शूजची ऑर्डर दिली होती. ऑर्डर दिल्यानंतर काही वेळातच साहिलला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला संबंधित कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत, “तुमची ऑर्डर होल्डवर आहे. ती कन्फर्म करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल,” असे सांगितले.
यानंतर आरोपीने विविध कारणे सांगत साहिलकडून वेगवेगळ्या टप्प्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. कधी ऑर्डर कन्फर्मेशन फी, कधी रिफंड प्रोसेस, तर कधी तांत्रिक अडचणीचे कारण देत ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम मागण्यात आली. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साहिलने वेळोवेळी पैसे पाठवले. काही वेळातच त्याच्या खात्यातून एकूण ५५,०६५ रुपये गेल्याचे त्याच्या लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साहिलने संबंधित वेबसाइटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच, ज्या क्रमांकावरून फोन आला होता तो क्रमांकही बंद लागल्याने साहिलला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली.
यानंतर साहिलने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, अनोळखी फोन कॉल्स, लिंक किंवा पैशांची मागणी आल्यास त्याला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे.