राज्यातील महापालिका निवणुकांचा रणसंग्राम आता एकमेकांच्या जीवावर उठला आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या अनेक गैरप्रकाराने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहे. मंगळवारी रात्री महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा थंडावताच नांदेड शहरात एक थरारक घटना घडली. आणि एकाप्रकारे निवडणुकीला गालबोट लागले. काँग्रेसच्या महिला उमेदवाराच्या पतीवर दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात महिला उमेदवाराचे पती थोडक्यात बचावले. शिवाजी भालेराव असं महिला उमेदवाराच्या पतीचं नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील शंकरनगर येथे प्रचार संपल्यानंतर प्रभाग एक मधील वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या उमेदवार सारिका शिवाजी भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव हे शंकरनगर येथील निवासस्थानी गल्लीतील काही लोकांसोबत गप्पा मारत खुर्चीवर बसले होते.
याच वेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी काही क्षणाच्या आत शिवाजी भालेराव यांच्यावर तलवारीचा घाव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रसंगावधान साधून शिवाजी भालेराव हे बसल्या जागी मागे सरकल्याने खुर्चीवरुन पडले आणि त्यांनी हल्लेखोराचा वार चुकवला. दोन हल्लेखोर हे तोंडाला रुमाल बांधून होते.
शिवाजी भालेराव काय म्हणाले?
दरम्यान, 'निवडणुकीत विरोधात भाषण का केलं, तू प्रचार कसा करतोस, तुझी बिर्याणी करतो. उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझी बिर्याणी करून टाकू. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या तलवारी दिसताय. कसा तू उद्या बाहेर निघतोस आणि मतदान करतोस', अशी धमकी दिली. मला पोलीस प्रशासनावर पूर्ण भरवसा आहे. आमच्या गरीब उमेदवाराला न्याय द्या. मी एक कार्यकर्ता आहे, प्रत्येकाच्या सुख दु:खात सोबत धावून जाणारा व्यक्ती आहे. जर खुर्ची आडवी केली नसती तर माझी मुंडी उडाली असती', असं शिवाजी भालेराव यांनी यांनी सांगितलं.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. तर या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केलीय. तर यावेळी बोलताना त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर भाजपच्या दोन्ही खासदारांनी सुनावलं आहे.
दरम्यान, या हल्यानंतर भयभयीत झालेल्या शिवाजी भालेराव यांनी आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही काय? गुन्हेगारीवर आळा घातला जाईल का? असा सवाल उपस्थित केला आहे. योग्य तपास करून न्याय द्यावा, अशी विनंती काँग्रेस शिवाजी भालेराव यांनी पोलिसांकडे केलीये. या प्रकरणाचा तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत