दैनिक भ्रमर : कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात कमानीजवळ असणाऱ्या चौकात तुंबळ दगडफेक झाली. सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यात आले होते. यावरून काल दुपारपासूनच तणाव निर्माण झाला आणि काल सायंकाळी हा वाद उफाळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये नमाजानंतर वाद झाला, ज्यामुळे वातावरण बिघडले. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकीसह दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक मागून जमाबावर नियंत्रण आणलं.
हे ही वाचा
दगडफेकीत अनेक लोक जखमी झाले आणि वाहनांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळ गाठून पोलिसांनी तात्काळ बळ तैनात करून ही परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण होतं, पण पोलिसांनी त्या परिस्थितीवर वेगाने नियंत्रण मिळवलं.
सीपीआर हॉस्पिटलजवळ गैरसमजुतीमुळे दोन समुदायांमध्ये वाद झाला, असं कोल्हापूरचे एसपी योगेश कुमार गुप्ता म्हणाले. “दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे” असेही त्यांनी नमूद केलं. हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.