नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून दिंडोरी येथील एका तक्रारदाराची 3 कोटी 64 लाख 9 हजार 300 रुपयांची फसवणूक करणार्या आरोपीस नाशिकच्या सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशाच्या धार जिल्ह्यातील नागोर येथे जाऊन अटक केली. त्याच्याकडून 15 लाख रुपये हस्तगत करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत माहिती अशी, की दिंडोरी येथील तक्रारदारास शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देऊ, असे आमिष दाखवून त्याचा विश्वास संपादन करून आरोपी अखलाख रईस पटेल (रा. नागोर, जि. धार, मध्य प्रदेश) याने विविध खात्यांवर एकूण 3 कोटी 64 लाख 9 हजार 300 रुपये भरायला लावले होते; मात्र या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने गेल्या 20 ऑक्टोबर 2025 रोजी आडगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
या फसवणुकीचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, कॉन्स्टेबल तुषार खालकर, सुनील धोकरट व विशाल चौधरी यांनी फसवणूक करणार्या व्यक्तीची तांत्रिक माहिती काढून नागोर येथे जाऊन आरोपी अखलाख रईस पटेल यास अटक केली. याकामी हवालदार हेमंत गिलबिले व तांत्रिक विश्लेषक पोलीस नाईक प्रदीप बहिरम यांनी सहकार्य केले. आरोपीकडून 15 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे, की कोणत्याही अज्ञात व्यक्तीने फोन कॉल करून बँक खात्याची माहिती विचारली, तर किंवा अनोळखी लिंक पाठविली, तर त्यावर क्लिक करू नये. तरीही फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.