मृत्यू कोणालाच चुकला नाही पण तो दैवाने झाला की ओढवून घेतला यात फरक. अस्मानी आणि सुलतानी संकटात अडकलेला शेतकरी आता मृत्यूला कवेत घेण्याचा प्रयत्न करत आहे. बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथील शेतकऱ्याची हत्या ताजी असतानाच नेवासा तालुक्यातील केवळ ४४ वर्षीय शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पुन्हा समोर आली आहे.
शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी रविवारी (ता. 17) विषारी औषध घेतले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी बाबासाहेब सरोदे यांनी तयार केलेल्या व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळत असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा
बाबासाहेब सरोदे यांनी व्हिडिओमध्ये, 'मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर आजपर्यंत जीवंत होतो, कर्जमाफी होऊन मी कर्जमुक्त होईल, या आशेवर मी जगत होतो. दोनदा भाजप सरकार आले, देवेंद्र फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले, त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही.'
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी रचेलेल्या, 'धनवंतानी पिळले, धर्मांधांनी छळले, चोर झाले साव', याप्रमाणे आज सरकार झाले आहे. या सरकारमध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नाही तर, इंडस्ट्रियलसाठी आहे. सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. म्हणून माझ्यावर आत्महत्या करायची वेळ येत आहे,' असे सरोदे यांनी म्हटले आहे.
'योग्य वेळी सरकारकडून मला मदत झाली असती, तर मी नक्कीच आयुष्य पुढे जगलो असतो. परंतु कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियांना मदत व्हावी,' असेही सरोदे यांनी व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे. आत्महत्या केलेले शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्यापश्चात आई नंदाबाई, पत्नी अर्चना, मुलगी किरण, मुलगा सुरज व रोशन असा परिवार आहे.