अहिल्यानगर : ३० हजारांची लाच मागून तडजोडीअंती २० हजारांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
रमेशकुमार जगन्नाथ धडील (वय 57) सहाय्यक आयुक्त, वर्ग-1, मत्स्य व्यवसाय (तांत्रिक), अहिल्यानगर, जि.अहिल्यानगर (रा. ए-5, अँक्वा लाईन रेसिडेन्सी, धोंगडे नगर, नाशिक रोड, नाशिक) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नी व बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झालेले आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून आजपर्यंत 3,88,800 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
तसेच तक्रारदार यांची बहीण यांचे नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून 29,16,000 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्यासाठी आरोपी रमेशकुमार जगन्नाथ धडील 40,000 रुपये लाचेची मागणी करत असल्या बाबतची तक्रार दि.20/3/2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार काल लाच मागणी पडताळणी करण्यात आली.
लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरता तक्रारदार यांच्याकडे 30,000 रुपये लाचेची मागणी केली. काल वरवंडी, ता.राहुरी येथील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी सापळा रचण्यात आला असता तक्रारदार यांच्याकडून आरोपी रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदर बाबत आरोपी धडील यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन, जि.अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.