अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात खळबळजनक घटना घडली आहे. फोनवर बोलत नसल्याचा आणि नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात २६ वर्षीय पीडिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, पीडिता ही नृत्यांगना आहे आणि मैत्रिणीसोबत राहते. तिची आरोपी राहुल अशोक कचरे (रहिवासी: खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी मागील पाच वर्षांपासून ओळख होती. २०२४ पासून मात्र दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही पीडिताने राहुलविरोधात तक्रार दाखल केली होती.
गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता राहुलने पीडितेला फोन करून धमकी दिली होती. तो फोनवर “तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. बोलली नाहीस तर मारून टाकीन” अशी थेट धमकी दिली होती. राहुलचे बोलणे ऐकून पीडितेला प्रचंड राग आला. तिने थेट राहुलचा फोन कट केला. त्यानंतर शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता, पीडिता तिच्या खोलीत होती. त्याचवेळी राहुल इमारतीजवळ दबा धरून होता. तो हातात कोयता घेऊन थेट खोलीत घुसला आणि ओरडला, “तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा नंबर का ब्लॉक केला?” असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्याने पीडितेच्या डोक्यावर, हातावर आणि बोटांवर कोयत्याने वार केले. ती गंभीर जखमी झाली.
पीडित यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात राहुल अशोक कचरेविरोधात खुनाचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत.