दुजाभाव नको ! अधिकाऱ्यांनो ही पुण्य कमवायची संधी परमेश्वराने दिलीय, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे असे का म्हणाले ? वाचा
राज्यातील विविध भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाय. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाली आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर,बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून नद्यांना पूर आलाय, शेतात गुडघाभर पाणी साचलं असून, अनेक ठिकाणी मातीही वाहून गेलीय. त्यामुळे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी आणि विरोधकांकडून होत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि पालकमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. यावेळी, बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला, तर अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के दिली जाईल. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुटपुंजी, याबाबत दुमत नाही. पण, मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत योग्य निर्णय घेऊ, राज्य सरकार कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान झालेल्या एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, असे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी दौऱ्यात आश्वस्त केले.
अधिकाऱ्यांनो, पुण्य कमविण्याची ही संधी आहे, त्यामुळे पंचनामे करताना दूजाभाव करू नका. आपत्ती असली तरी या माध्यमातून पुण्य कमावण्याची संधी परमेश्वराने दिली आहे. प्रत्येक नुकसानीचे पंचनामे करा अशा सूचना कृषिमंत्री भरणे यांनी अहिल्यानगरमधील दौऱ्यातून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.