अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकदा बनावट दूधावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. आता अहिल्यानगरमधील एमआयडीसीमध्ये चक्क बनावट बासमती तांदूळ तयार करून तो विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याच्या प्रकार अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणलाय. सुमारे 62 लाख रूपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.
या बनावट तांदळाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अहिल्यानगर येथील MIDCमध्ये बनावट बासमती राईस तयार होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार एका पथकाने एमआयडीसीमधील एका कंपनीच्या गोडाउन वर छापा टाकला.
त्यावेळी त्याठिकाणी साधा तांदूळला केमिकल पावडर लाऊन त्यास सुगंधी असल्याचा भास निर्माण करून बासमती राईस असे नाव असलेल्या खुशी गोल्डच्या बॅगमध्ये पॅकिंग करत असल्याचे आढळून आले.
या तांदूळ चा नमुना घेण्यात आला असून असा एकूण 62 लाख रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. तसेच केमिकल पावडर सुद्धा ताब्यात घेतली आहे. या कंपनीचे मालकाचे शहरामधील दाल मंडई येथे दुकान असून तेथून अशा बनावट बासमती राईसची विक्री होत असल्याचा संशय आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ,ज्या व्यक्तीच्या गोडावूनवर छापा टाकला आहे. त्याचे शहरातील दाळमंडई परिसरातही दुकान असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुकानातून बनावट बासमती तांदळाची विक्री केली जात असल्याचा संशय असून, यासंबंधीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणार्या भेसळीच्या धंद्यावर आळा बसला आहे.